जळोची – बारामतीच्या राष्ट्रवादी भवन मधून २० वर्षापासून असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहायकाच्या दालनातून शरद पवार गटाने त्यांचं सामान हलवले आहे.
आम्हाला कोणाचाही त्रास नाही.. आमच्याशी कोणी बोललेलं नाही.. परंतु आमचं दैवत या कार्यालयातून हलवलं आता तिथे राहून काय उपयोग असा उद्विग्न सवाल करत कार्यकर्त्यांनी हे कार्यालय सोडले.
पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर बारामतीतील पक्ष कार्यालय अजित पवारांकडे गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे कार्यालय आता भिगवन चौकातील शाकंभरी हॉटेलच्या शेजारी गेले आहे.
नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन देखील झाले. हे कार्यालय राष्ट्रवादी भवन मधून भिगवण चौकात का हलवलं त्याचा खुलासा आता शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मूळच्या कसबा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये असलेले राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो राष्ट्रवादीतील फटाफटीनंतर एका रात्रीत हलवले गेले.
आमचे दैवतच इथे नसल्याने आता आम्ही या कार्यालयात येणार नाही असे सांगत कार्यकर्त्यांनी आपला मुक्काम इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी भवन मध्ये असलेले सुप्रिया सुळे यांच्या कॅबिन खाली करण्यात आली आणि हे सामान भिगवण येथील कार्यालयात नेण्यात आले.
यावेळी शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यां भावुक झाल्या. आम्हाला सामान हलवायला सांगण्यात आलं नव्हतं असे देखील त्या म्हणाल्या. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तेव्हापासून या कार्यालयात कुणीही आलं नसल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे.