रांची – भरधाव रिक्षाच्या धडकेमुळे एका न्यायाधीशाचा मृत्यू होण्याची घटना आज घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, असे पोलीसांनी सांगितले. बुधवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेमध्ये धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांचा मृत्यू झाला आहे.
पहाटे 5 वाजता फिरायला गेले असताना आनंद यांना भरधाव रिक्षाने धडक दिली होती. अपघातानंतर रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार दोघेही पळून गेले होते. या घटनेचा सीसीटिव्हीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा हत्येचा प्रकार असावा असे गृहित धरून पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. त्यांतर केलेल्या तपासात रिक्षा सापडल्यानंतर गुरूवारी दोघाजणांना अटक करण्यात आली.
न्यायाधीश आनंद यांनी अलिकडेच एका गॅंगस्टरला जामीन नाकारला होता. त्याच प्रकरणामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याच्या संशयातून तपास केला जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून तपासाचे कामकाज न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश झारखंडच्या मुख्य न्यायाधीशांनी दिले आहेत.