ममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली – शिवसेना

पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याच्या पाऊलावरून स्तुतिसुमने

मुंबई – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नेमून मोदी सरकारला झटका दिला. ममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली, अशी स्तुतिसुमने शिवसेनेने उधळली आहेत.

पेगॅसस पाळत प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) करण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, मोदी सरकार ती मागणी मान्य करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. अशात ममतांनी उचललेल्या पाऊलाचे शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून स्वागत करण्यात आले आहे.

पेगॅसस प्रकरण मोदी सरकारला गंभीर वाटत नसल्याची बाब जरा रहस्यमयच आहे. त्या सरकारने जे करायला हवे ते बंगालने केले. पाळत प्रकरणाची चौकशी करणारे बंगाल हे पहिले राज्य ठरले. आमचे छोटे पाऊल इतरांना जाग आणेल, असे ममतांचे म्हणणे खरेच आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्‍स विभागाची जोड शाखा म्हणून पेगॅससकडे यापुढे नागरिकांना पहावे लागेल. कारण, पेगॅससला प्रेमाने बगलेत मारून मोदी सरकार काम करत आहे. म्हणूनच ममतांचे धाडसी पाऊल महत्वाचे आहे, असे विश्‍लेषण अग्रलेखातून करण्यात आले आहे.

पेगॅसस या इस्त्रायली स्पायवेअरचा वापर करून सरकारी यंत्रणांनी राजकीय नेते, पत्रकार आणि मान्यवर नागरिकांचे फोन हॅक करून पाळत ठेवल्याचे आरोप होत आहेत. ते स्पायवेअर केवळ सरकारांना उपलब्ध केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.