सातारा – राष्ट्रीय काॅंग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने दि. २८ डिसेंबरला नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १५ हजार काॅंग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील काॅंग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे, निवास थोरात, ॲड. श्रीकांत चव्हाण, धनश्री महाडिक, रजनी पवार, ऋतुराज मोरे, सर्जेराव पाटील, मनोजकुमार तपासे, बाळासाहेब शिरसाट, अमरजित कांबळे, सर्फराज बागवान, अन्वर पाशा खान, मालन परळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नरेश देसाई म्हणाले, राष्ट्रीय काॅंग्रेसला एक परंपरा असून हा पक्ष २८ डिसेंबरला १३८ वर्षे पूर्ण करत आहे. यासाठी नागपूरला महासंमेलन होत असून याची पूर्ण तयारी होत आलेली आहे. या संमेलनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खा. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहूल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देश आणि राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होतील. यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक ते दोन हजार कार्यकर्ते नेण्याबद्दल नियोजन आहे.
या महासंमेलनात १५ हजार कार्यकर्ते निश्चित सहभागी होतील असा विश्वास आहे. तसेच नागपूरमधील मेळाव्यात राज्य आणि देशातून १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असाही अंदाज आहे.