कोरेगाव -कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सात पुलांसाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे नाबार्डच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे दळणवळणाच्या सुविधा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरेगाव मतदारसंघातील रस्त्यांची कामे करताना वसना, वांगणा, तीळगंगा आणि येरळा या नद्यांवरील दर्जेदार पुलांच्या उभारणीसाठी नाबार्डमार्फत मोठ्या प्रमाणात निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून सात पुलांची कामे मंजूर झाली आहेत. कुमठे-चांदवडी-जळगाव रस्त्यावर वसना नदीवरील पुलासाठी एक कोटी 20 लाख, कुमठे गावाच्या जोड रस्त्यावर तीळगंगा नदीवरील पुलासाठी दोन कोटी 30 लाख,
जळगाव येथे वसना नदीच्या पलीकडे मळा नावाच्या शिवारातील नागरी वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी एक कोटी 20 लाख, सातारारोड पाडळी येथे स्मशानभूमीनजीक वसना नदीवरील पुलासाठी अडीच कोटी, भाकरवाडी येथे वसना नदीवरील पुलासाठी साडेतीन कोटी, खटाव तालुक्यात दरूज-पवारवाडी पूल, खातगुण-विसापूर रस्त्यावरील पुलासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
मतदारसंघात दिवाळी धमाका
आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सात पुलांसाठी भरघोस निधी मिळाल्याने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेला दिवाळीसाठी मोठी भेट मिळाली आहे. हे पूल उभारल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस आणि इतर शेतीमालाची वाहतूक करणे सोपे होणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशनांमध्ये मतदारसंघावर निधीची बरसात होते. आता मतदारसंघात दिवाळी धमाका झाला आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी आमदार महेश शिंदे हे बंपर निधी आणतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.