नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील अवैध मदरशांची चौकशी करणाऱ्या एसआयटीने आपला अहवाल योगी सरकारला सादर केला आहे. एसआयटीने सुमारे 13 हजार अवैध मदरसे बंद करण्याची शिफारस केली आहे. यातील बहुतांश अवैध मदरसे हे नेपाळ सीमेवर आहेत. विशेष म्हणजे एसआयटीने आपल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीने 13000 मदरसे बंद करण्याची शिफारस केली आहे. महाराजगंज, श्रावस्ती, बहराइचसह 7 जिल्हात मदरशांची संख्या 500 पेक्षा जास्त आहे, तर बहुतांश मदरसे नेपाळ सीमेला लागून आहेत. एसआयटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या मदरशांनी त्यांचे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील दिलेला नाही.
एसआयटीने अशी भीती व्यक्त केली की, कटाचा एक भाग म्हणून दहशतवादी फंडिंगसाठी जमा केलेला पैसा मदरशाच्या बांधकामासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे मदरशाचे म्हणणे आहे की, हे बांधकाम देणगीतून करण्यात आले आहे.
मात्र देणग्यांबाबत मदरशांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मदरशांना होणाऱ्या निधीची चौकशी करण्याच्या सूचना एसआयटीला देण्यात आल्या होत्या. एसआयटीच्या तपासादरम्यान, बहुतांश मदरशांना परदेशातून निधी मिळत होता. एवढेच नाही तर याठिकाणी देशविरोधी कारवाया करण्याचे कामही केले जात होते.