Rahul Narvekar : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून शिवसेनेबाबत घेतलेल्या सुनावणीचे सर्व दस्तावेज जमा करण्यास सांगितले आहे. नार्वेकर यांनी हे दस्तावेज १ एप्रिलपर्यंत सादर करायचे आहेत. या प्रकरणची पुढील सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता. गुरुवारी ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमताच्या चाचणीवर अवलंबून राहणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का? असा थेट सवाल ठाकरे गटाच्या वकिलांनी करत नार्वेकरांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
गुरुवारच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे, नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल. अशी विनंती कोर्टाला केली. तसेच अध्यक्षांनी तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला आहे, असेही कोर्टाच्या त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तर शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि कोर्टात दाखल केलेली कागदपत्रे यात तफावत आहे. हा फक्त एक मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत, असा दावा केला. यावर सरन्यायाधिशांनी आमच्या निकालपत्रात जे लिहिलेले त्याविरोधात निर्णय नाही झालाय का? असा थेट सवाल साळवेंना विचारला.
शिंदे गटाला धक्का
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी, अशी शिंदेगटाची महत्वाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.