पुणे -राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत होणाऱ्या दहावी व बारावी लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. या वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अंतिम वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे. दहावी परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च 2023 या दरम्यान होणार आहे. अंतिम वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा अथवा महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्यावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे. मात्र अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेल तसेच व्हॉट्सऍप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.