सातारा – प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. संवर्ग एकमधून 334 शिक्षकांपैकी 252 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. संवर्ग दोनमधून 173 शिक्षक पात्र असून बदल्यांची प्रक्रिया सुरु झाल्याने शिक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रकिया सुरु झाली असून ्संवर्ग एक व संवर्ग दोनमधील 1763 शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केले होते.
अर्ज पडताळणीत एक हजार 47 शिक्षक पात्र ठरले होते. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे आणि एका शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. नव्या प्रक्रियेनुसार बदलीपात्र शिक्षकांना 50 शाळांचा पसंतीक्रम देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुगम आणि दुर्गम शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोषित केली होती. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु झाली आहे.
बदलीपात्र शिक्षकांमधील 18 शिक्षकांबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अपील दाखल करण्यात आले होते. बदलीपात्र शिक्षकांनी चुकीची माहिती अपलोड केल्याचे दिसून आले आहे. या अपिलांची सुनावणी जिल्हा परिषदेत झाली होती. संवर्ग एकमधून 334 पैकी 252 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या असून संवर्ग 2 मधून 173 पैकी किती शिक्षकांच्या बदल्या होतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग एकमधील 252 शिक्षकांच्या बदल्या ऍपद्वारे झाल्या. संवर्ग दोन मध्ये 173 शिक्षक बदलीसंदर्भातील माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांना त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहेत.
– शबनम मुजावर ( प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा)