कोरेगाव भीमा – ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह इतर विभाग सज्ज झाले आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीचाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे शहर पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस यांचे सात हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा, आरोग्यपथक, जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
गतवर्षचा सोहळा करोनाच्या सावटाखाली झाला असल्याने यावर्षी गर्दीच्या उच्चांकाची शक्यता आहे. या ठिकाणी शहर व ग्रामीण पोलीस फौजफाटा आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मानवंदना कार्यक्रमासाठी देशभरासह महाराष्ट्रातील विदर्भ, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागातून जास्त प्रमाणात जनसमुदाय येतो. तसेच मुंबई, पिंपरी-चिंचवड, भोसरी या भागातून व महाराष्ट्राबाहेरून देखील लोक येत असतात.
मोठा फौजफाटा
कायदा सुव्यवस्थेसाठी हवेलीच्या हद्दीत शहर पोलीस दलाच्या वतीने एक पोलीस आयुक्त, एक सहपोलीस आयुक्त, पाच अतिरिक्त आयुक्त, 15 उपायुक्त, 21 सहायक आयुक्त, 90 पोलीस निरीक्षक, 250 सहायक निरीक्षक, चार हजार पोलीस अंमलदार, एक हजार होमगार्ड, 6 क्यूआरटी टीम,
पाच आरसीपी टीम, 15 बीडीडीएस टीम असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. तर शिरूरच्या हद्दीत ग्रामीण पोलीस दलाचेही पाच अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी, 16 उपअधीक्षक तसेच 250 पोलीस अधिकाऱ्यांसह अडीच हजार पोलीस व एक हजार होमगार्ड बंदोबस्तास असणार आहेत.