कराची – पाकिस्तानातील कोळशाच्या एका खाणीमध्ये झालेल्या स्फोटात किमान १२ जण ठार झाले. तर ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हरनाल जिल्ह्यातल्या झरदालो भागातल्या या खाणीमध्ये झालेला हा स्फोट वायूमुळे झाला होता, असे अधिकार् यांनी सांगितले.
मिथेन वायूमुळेरात्रीच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला तेंव्हा खाणीमध्ये २० कामगार होते, असे बलुचिस्तानचे मुख्य खाण निरीक्षक अब्दुल गनी बलोच यांनी सांगितले. स्फोटानंतर लगेच सुरू करण्यात आलेले मदतकार्य आज सकाळी समाप्त झाले. मदत पथकाला खाणीमध्ये १२ मृतदेह आढळले. तर जखमी झालेल्या ८ जणांना रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमी खाण कामगारांच्या उपचारांसाठी सर्व ती मदत देण्याचे निर्देशही शरीफ यांनी दिले आहेत. पाकिस्तानच्या कोळसा उत्पादनात बलुचिस्तान प्रांताचा वाटा ५० टक्के आहे.
तथापि, या कोळसा खाणींमध्ये गॅस तयार झाल्यामुळे खाणीतील अपघात होणे पाकिस्तानमध्ये सामान्य आहे. सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि कामाची खराब परिस्थिती हे वारंवार अपघातांचे प्रमुख कारण असल्याची खाण कामगारांची तक्रार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बलुचिस्तानमधील एका खाणीत लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता.
तर सप्टेंबरमध्ये सिंध प्रांतातील खाण खचल्यामुळे ३ कामगार गाडले गेले होते. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोन वेगवेगळ्या खाणींमध्ये अपघातात ३ कामगार ठार झाले होते. २०२२ मध्ये, हरनाई जिल्ह्यात कोळसा खाणीत गॅसमुळे झालेल्या स्फोटात सहा खाण कामगार ठार झाले होते.