कराड – सातारा लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी यांना ने-आण करण्यासाठी कराड आगाराकडून 110 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील कराड उत्तरमधील मतदान केंद्रासाठी 16 तर कराड दक्षिण मतदार केंद्रासाठी 23 एसटी सोमवारी सकाळी 7 वाजता रवाना करण्यात आल्या असल्याची माहिती कराड आगारप्रमुख जे. डी. पाटील यांनी दिली.
सातारा मतदार संघातील वाई, कोरेगाव, कराड उत्तर व कराड दक्षिण, पाटण व सातारा येथील विविध ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी मतदानाचे साहित्य घेवून जाण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेवून जाण्यासाठी कराड आगारामधून बसेसची सोय करण्यात आली आहे. कराड उत्तर व दक्षिण मतदार संघातील काही गावे दुर्गम परिसरात आहेत. मात्र येथेही मतदान केंद्रे असल्याने अशाठिकाणी त्यांना सुरक्षित व वेळेत पोहोचवण्यासाठी एसटीची सोय करण्यात आली आहे.
एसटी मतदानासाठी कार्यरत असल्याने आगाराच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्यांवर मात्र याचा परिणाम होणार आहे. परिणामी वडापची वाहतूक सुसाट होणार असून अशावेळी प्रवाशांकडून मुद्दामहून जादा पैसे खासगी वाहनांकडून घेतले जाण्याचे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मतदानासाठी कार्यरत असणाऱ्या बसेस मंगळवारी सायंकाळी उशिरा डेपोमध्ये दाखल होणार असल्याने इतर प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे.