जेरुसलेम – वेस्ट बॅंकेवर इस्रायलने बुधवारी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 11 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. वेस्ट बॅंकेतील नाबलूस भागात इस्रायली फौजांनी हा छापा घातला होता. या भागामध्ये लपून बसलेल्या 3 संशयित दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली, असे इस्रायलने म्हटले आहे.
हे 3 दहशतवादी इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती, असेही इस्रायलने म्हटले होते. इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इस्लामिक जिहाद या दहशतवादी गटाचे 2 आणि हमासचा एक दहशतवादी मारला गेला असल्याची माहिती मिळते आहे. यावेळी झालेल्या संघर्षात द लायन डेन या संघटनेचे सदस्यही सहभागी होते. मात्र या संघटनेचे कोणी यावेळी ठार झाले का हे समजू शकलेले नाही.
इस्त्रायलच्या या छाप्यानंतर पॅलेस्टिनींनी इस्रायलच्या दिशेने 6 रॉकेटचा मारा केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. बुधवारच्या छाप्यानंतर गुरुवारी दुपारी पॅलेस्टाईनने ही रॉकेट डागल्याचे इस्रायलने म्हटले आहे. मात्र पॅलेस्टाईनमधील कोणत्याही दहशतवादी गटाने या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी स्विकारलेली नाही.
इस्रायलमधील अश्केलोन आणि स्टेरोट या शहरांच्या दिशेने डागण्यात आलेल्या 6 रॉकेटपैकी 5 रॉकेट हवेतच रोखण्यात आली. तर एक रॉकेट इस्रायलमधील एका मोकळ्या शेतजमिनीमध्ये पडले. या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने मध्य आणि उत्तर गाझा पट्ट्यातील काही ठिकाणांवर बॉम्बफेक देखील केली आहे. मात्र त्यामध्ये कोणीही मरण पावल्याचे वृत्त नाही.