नवी दिल्ली – देशभरात करोनाचे 11 नवीन उत्परिवर्तीत विषाणू आढळून आले आहेत. गेल्या वर्षी 24 डिसेंबरपासून 3 जानेवारीदरम्यान विमानतळ आणि बंदरांवर करण्यात आलेल्या तपासण्यांदरम्यान हे व्हेरियंट आढळून आले आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हे सर्व व्हेरियंट भारतात पूर्वीपासूनच आहेत, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
अलीकडच्या कालावधीमध्ये परदेशातून आलेल्या 19 हजार 227 प्रवाशांच्या नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 124 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. संबंधित व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
यामधील 40 जणांच्या नमुन्यांचे जिनॉम सिक्वेन्सिंगचे रिपोर्ट आले आहेत. त्यामध्ये “एक्सबीबी’ आणि “एक्सबीबी-1′ हा उत्परिवर्तीत विषाणू सर्वाधिक 14 नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. “बी.एफ.7.4.1′ हा विषाणू एका नमुन्यात आढळून आला आहे. गेल्या 24 तासात करोनाच्या 188 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या करोनाचे 2,554 सक्रिय रुग्ण आहेत.