नवी दिल्ली – संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि इटलीचे संरक्षण महासचिव आणि राष्ट्रीय शस्त्रास्त्र विभाग संचालक लेफ्टनंट जनरल लुसियानो पोर्टोलानो यांच्या सह-अध्यक्षतेखाली बुधवारी नवी दिल्ली येथे भारत-इटली संयुक्त संरक्षण समितीची दहावी बैठक पार पडली.
दोन्ही बाजूंनी संरक्षण उद्योग आणि लष्करी सहकार्याच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. त्यांनी हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र आणि सुरक्षा परिस्थिती यावरही विचार विनिमय केला.
संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या इटली भेटीदरम्यान ऑक्टोबर 2023 मध्ये भारत आणि इटली दरम्यान संरक्षण सहकार्याबाबतचा करार झाला होता.
दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापक चौकट प्रदान करण्याच्या करारासह, भारतातील सह-उत्पादनासह संयुक्त प्रकल्पांसाठी दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना एकत्र आणण्याचे उपाय आणि माध्यम यावर चर्चा केली.
भारतीय विक्रेत्यांना इटालियन संरक्षण विषयक कंपन्यांच्या जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची सूचना संरक्षण सचिवांनी केली. ज्याचा लाभ दोन्ही देशांना मिळेल आणि पुरवठा साखळीची लवचिकता सुधारेल.