इस्लामाबाद – इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने पाकिस्तानचा जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरेन्सेस प्लस (जीएसपी प्लस) हा दर्जा मागे घेण्याची मागणी युरोपीय संघाकडे केली होती, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे नवीन गृहमंत्री अताउल्लाह तरार यांनी केला आहे. पीटीआय पक्षाने देशाची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असेही तरार यांनी आज सांगितले.
देशातील व्यापाराचा विकास करण्यासाठी चांगले प्रशासन आणि स्थायी विकासाला चालना देण्यासाठीचे विशेष प्रोत्साहन म्हणजेच जीएसपी प्लस हा दर्जा असतो. पाकिस्तानला हा विशेष दर्जा २०१४ साली देण्यात आला होता. या दर्जाला आता २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या दर्जांतर्गत युरोपातील बाजारपेठेमध्ये निर्यात करण्यासाठी अत्यल्प किंवा शून्य निर्यात शुल्क आकारले जाते. हा जीएसपी प्लसचा दर्जा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका पीटीआयने युरोपीय संघाकडे सादर केली होती, असा आरोप तरार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.
युरोपीय संघाशी संपर्क करणे आणि जीएसपी प्लस दर्जा मागे घेण्याची मागणी करणे हा पाकिस्तानवरील हल्ला आहे. पाकिस्तानचे अर्थकारण नष्ट करणे आणि देशातील गरीब जनतेला आणखीन अडचणीत ढकलण्याचे हे कारस्थान होते, असेही तरार म्हणाले.
मात्र तरार यांनी केलेले हे आरोप इम्रान खान यांच्या पक्षाने काही तासातच फेटाळून लावले.
पाकिस्तानचा जीएसपी प्लस दर्जा मागे घेण्याची मागणी करणारे कोणतेही पत्र युरोपीय संघाला पाठवण्यात आले नव्हते, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. तरार यांनी केलेले हे आरोप म्हणजे खोटेपणा, आरोप आणि निरर्थकपणाचे मिश्रण आहे, असे पक्षाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी वाटाघाटी करायला परराष्ट्र मंत्री इशाक दर हे विलंब करत असल्याचा आरोपही पीटीआयने केला आहे.
इम्रान खान यांनी निवडणुकीचे परीक्षण केल्याशिवाय पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये, अशी मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली होती.
जीएसपी प्लस दर्जामुळे पाकिस्तानमधील महागाई कमी झाली असती आणि राजगाराच्या संधीही वाढल्या असत्या. मात्र राजकीय स्वार्थासाठी हा दर्जा मागे घेऊन देशाला अडचणीत आणण्याचे कारस्थान पीटीआयने केल्याचा आरोप तरार यांनी केला.