मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने 500 फुटांपर्यंत घरांना करमाफीबाबत वचनपुर्तीची घोषणा केली होती. अखेर आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत पाचशे फुटांचे घर असणाऱ्या कर माफीचा दिलासा मिळाला आहे. तसेच करोनाच्या काळामुळे शाळेतील बसेससाठी करमाफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारी, 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार 46.45 चौ.मी. (500 चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार आता या निर्णयाची 1 जानेवारी 2022 पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील 16.14 लाख निवासी मालमतांना या संपूर्ण कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. या सवलतीमुळे महापालिकेच्या कर महसुलात सुमारे 417 कोटी आणि राज्य शासनाच्या महसुलात सुमारे 45 कोटी असा एकूण 462 कोटींचा महसूल कमी होणार आहे.
तसेच कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून 100 टक्के कर माफ करण्यात येईल.
मात्र ज्या स्कूल बस प्रकारातल्या वाहनांनी वरील कालावधीसाठीचा कर भरला असेल तर अशा कराचे महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1998 मधील कलम 9 (4 अ) नुसार आगामी काळात समायोजन करण्यात येईल.