नवी दिल्ली – भारताची स्टार बॅडमिंटनपटू व फुलराणी सायना नेहवालने यंदाच्या मोसमाची सुरुवात सकारात्मक केली. तिने येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.
गेल्या अनेक काळापासून सायना सातत्याने दुखापतींचा सामना करत होती. या स्पर्धेत मात्र ती पूर्ण तंदुरुस्त होऊन सहभागी झाली आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या तेरेजा स्वाबीकोव्हाने पहिल्या गेममध्ये 22-20 अशी पिछाडीवर असताना दुखापतीने सामना सोडला व सायनाला विजेती घोषित करण्यात आले.
आता दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना भारताचीच मालविका बनसोडशी होणार आहे. मालविकाने पहिल्या फेरीत भारताच्याच समिया इमाद फारुखीचा 21-18, 21-9 असा पराभव केला.
पुरुष गटात एच. एस. प्रणोयने स्पेनच्या पावलो अबीयनवर 21-14, 21-7 असा विजय मिळवला. लक्ष्य सेनने इजिप्तच्या आदम हातिमलेगमलचा 21-15, 21-7 असा पराभव केला.