खेड शिवापूर, (वार्ताहर) – शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या विशेष प्रयत्नातून शिवगंगा खोऱ्यासाठी सुमारे १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीतून श्री नागेश्वर मंदिर, श्रीरामनगर येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या भिंत बांधकामामुळे शिवगंगा नदीच्या पूरस्थितीत मंदिराला होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. रविवार, १० मार्च रोजी या भिंत बांधकामाचे भुमिपूजन रमेश कोंडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना कोंडे म्हणाले, “शिवगंगा खोरे हे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्री नागेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून, दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, शिवगंगा नदीच्या पूरस्थितीत मंदिराला धोका निर्माण होत असल्याने, या भिंत बांधकामाची गरज होती.” “मी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी त्वरित या मागणीला मान्यता देत 20 लाख रुपये निधी मंजूर केले,” असेही कोंडे यांनी सांगितले.
या भिंत बांधकामामुळे शिवगंगा नदीच्या पूरस्थितीत मंदिराला होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. तसेच, मंदिराच्या परिसरात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे कोंडे यांनी यावेळी सांगितले.
त्याप्रसंगी राजेंद्र पवार,अशोक बांदल,बंद पवार,सुनील नावाडकर,अविनाश हवालदार,आण्णा हवालदार ,सरपंच अक्षदा हवालदार व संजय दिघे,राजू सट्ठे,दीपाली वाव्हाळ भूषण नावाडकर,आदित्य हवालदार तसेच शिवगंगा खोऱ्यातील नागरिक श्रीरामनगर ग्रामस्थ व श्री नागेश्वर जीर्णोद्धार समिती सदस्य उपस्थित होते.