खेड शिवापूर – कासुर्डी खे. बा. (ता. भोर) येथील एलिग्झर सोलटेक या कार केअरचे मटेरियल बनवणाऱ्या कंपनीस शनिवारी (दि. 19) दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनी जळून खाक झाली आहे.
पोलीस प्रशासन व महसूल खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये चारचाकी वाहनांसाठी लागणारे कलर-स्प्रे आणि चारचाकी वाहनांना पॉलिशसाठी लागणाऱ्या वस्तू बनवल्या जात होत्या. शनिवारी (दि. 19) दुपारी कंपनीमध्ये काम चालू असताना एका विभागात अचानक आग लागली.
सर्वत्र ज्वलनशील पदार्थ आणि रसायने असल्याने या रसायनांनी पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. कामावर असलेल्या सुमारे 30-40 कामगारांनी प्रसंगावधानाने कंपनीच्या बाहेर पळ काढल्याने जीवितहानी झाली नाही. आगीची तीव्रता एवढी होती की कंपनी परिसरात लावलेली आठ दुचाकी वाहनेही या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत.
घटनेची माहिती कळताच राजगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसरात बंदोबस्त लावून स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक पाण्याचे टॅंकर व अग्नीशमन दलाच्या मदतीने सुमारे दोन तासाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.