पुणे – आपण अनेकदा पाहतो की काही स्वार्थी लोक आपला केवळ स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे आपण अनेकजण पाहतो. मात्र या सर्व गोष्टींची पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथील ग्रामस्थांना कोणतीही बाधा होत नाही. कारण येथिल लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहतात.
आज हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचा महत्वाचा सण आहे. हिंदूंचा अक्षय तृतीया, भगवान परशुराम जयंती तर मुस्लिमांचा रमजान ईद हा सण आहे. या गावात हे दोन्ही सण सर्वधर्मीय भक्तीभावाने साजरे करतात. एका बाजूला भजन तर दुसऱ्या बाजूला अजान असते. मात्र यांच्यात कधीच वाद होत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ज्यावेळी हिंदूंचे सण असतात तेंव्हा या गावात मुस्लिम बांधव देखील तो सण उत्साहात साजरा करतात तर जेव्हा मुस्लिमांचा सण असतो तेंव्हा हिंदू धर्मीय तेवढ्यात भक्तीभावाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत असतात. या गावचे सरपंच अमोल कोंडे यांनी सांगितले की, खेड शिपावरू गावात जुन्या काळापासून हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक एकमेकांशी कौटुंबिक संबंध जपून आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात ते कायम सहभागी होत असतात. हिंदू सणांच्या दिवशी गावातील मुस्लीम बांधव त्यांच्या घरामध्येही पुरणपोळी बनवतात. तर दर्ग्याच्या नैवेद्यासाठी हिंदू बांधव मलिदा तयार करतात.
येथील दर्ग्याचे विश्वस्त फिरोज मुजावर यांनी सांगितले की, खेड शिवापूर येथील कमरअली दरवेश बाबांवर मुस्लिमांसह, हिंदू ग्रामस्थांचेही प्रेम आणि श्रद्धा आहे. दोन्ही समुदायांचे एकमेकांशी असलेले कौटुंबिक संबंध हेच आमच्या एकोप्याचे गमक आहे.