- एक अल्पवयीन ताब्यात
- अवघ्या दोन तासांत आरोपींना मुसक्या
- देहूरोड पोलिसांची कामगिरी
देहूरोड – रावण टोळीच्या जाधव यांचा मंगळवारी (दि. 17) सायंकाळी खून झाला. त्यानंतर देहूरोड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने अवघ्या दोन तासांत मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सोन्या उर्फ अविनाश राजेंद्र जाधव (वय 25, रावेत) असे खून झालेल्याचे नाव आहे. रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा अडीच वर्षांपूर्वी खून झाला, त्याचा तो भाऊ होता.
आशिष विशाल जगताप (वय 23), प्रसाद अशोक आल्हाट (वय 25), विकास गोरख तांदळे (वय 21, रा. पंचशील हौसिंग सोसायटी, सेक्टर नंबर 27, निगडी प्राधिकरण, पुणे) आणि सागर रमेश धनवटे (वय 18, रा. प्राधिकरण टपाल कार्यालयाजवळ, संभाजी चौक, निगडी) असे अटक केलेल्यांची चौघांची नावे आहेत. तर या घटनेत एका 17 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे प्रकटीकरणाचे गस्त पथकावर असणारे पोलीस नाईक प्रीतम वाघ यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली. रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा अज्ञात इसमांनी खून केला. त्यानंतर हल्लेखोर किवळे येथून पसार होणार आहेत. ही माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांना देण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील आणि देहूरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस नाईक वाघ, प्रशांत पवार, पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ, विजय गेंगजे, पोलीस हवालदार श्याम शिंदे आदींच्या पथकाने किवळे येथे सापळा रचला.
या सापळ्यात पाच जण सापडले. त्यातील एक अल्पवयीन आहे. आशिष जगताप याच्याकडे चौकशी व तपास केल्यानंतर त्याने दोन वर्षांपासून सोन्या मानसिक त्रास देत होता तसेच मारहाण करीत असल्याच्या रागात मंगळवारी आकुर्डी येथील टपाल कार्यालयासमोर एका गॅरेजजवळ त्याचा मित्रांसोबत गॅरेजमधील साहित्याने मारहाण केल्याची कबुली दिली. कबुली दिल्यानंतर चौघांना अटक करीत एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. सायंकाळी निगडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
अवघ्या दोन तासांत आरोपी जेरबंद
शिरगाव येथून परतत असताना देहूरोड हद्दीत एका हॉटेलमध्ये मिसळ खात असणाऱ्या एका तरुणाला चौघांनी मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी कारवाई करीत तिघांना पकडले. त्यावेळी दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये श्रेयवाद रंगला. आता देहूरोड पोलिसांनी निगडी पोलीस ठाण्याच्या खून प्रकरणातील हल्लेखोरांना दोन तासांत अटक केले. गुन्हा दाखल होण्यापूर्वी अटक करीत निगडी पोलिसांच्या स्वाधीन केल्याने देहूरोड पोलिसांचे पोलीस दलात कौतुक केले जात आहे.