पिंपरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात आज व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बऱ्याच व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. तर, काही व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग न घेत दिवसभर दुकाने खुलीच ठेवली.
पुणे शहरात 17 ते 19 तारखेदरम्यान तीन दिवसे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी असोसिएशनने घेतला. किराणा, मेडिकल आदी दुकाने त्यातून वगळण्यात आली. त्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही बुधवारी (दि. 19) आणि गुरूवारी (दि. 20) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने चिंचवड येथील बैठकीत घेण्यात आला. किराणा व भुसार माल, भाजी मंडई आणि मेडिकल स्टोअर त्यातून वगळले आहे. संबंधित बैठकीला पिंपरी-चिंचवड मर्चंट चेंबर, पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांची संघटना, प्लॉय ऍण्ड लॅमिनेट असोसिएशन, पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन, टूल्स ऍण्ड ट्रेडर्स असोसिएशन (चिंचवडगाव) आणि चिंचवड स्टेशन व्यापारी संघटना, पिंपरी-चिंचवड औद्योगिक संघटना (पिंपरी-चिंचवड), संत तुकारामनगर व्यापारी संघटना आदींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पिंपरी बाजारपेठेतील कापड बाजारात बरीच दुकाने खुली असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. काही व्यापाऱ्यांनी मात्र स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती. तथापि, काही व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून सायंकाळी उघडली. येथील मोबाइल खरेदी-विक्रीच्या बाजारपेठेत मात्र बहुतांश दुकाने खुलीच असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. चिंचवड येथील बाजारपेठेत देखील बरीच दुकाने खुली होती.
“करोना’च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये देखील व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील व्यापार संघटनेकडून आणखी काही दिवस दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णय झाल्यास त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये देखील निर्णय घेतला जाईल. दुकाने बंदचा निर्णय हा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे.
– गजानन बाबर, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड.