तीन पिस्टलसह चाळीस काडतुसे हस्तगत; सातारा, पुणे गुन्हे शाखेची कारवाई
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी)
पुणे येथील कुुख्यात गुंड व खंडणी, खूनाचे गुन्हे दाखल असलेल्या परवेज हनिफ शेख (रा.गंगानगर हडपसर) याच्या मुसक्या सातारा व पुणे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आवळल्या. संगम माहुली येथील एका मंदिरात बसलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून तीन पिस्टल व चाळीस जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, परवेज शेख याच्यावर सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असून सध्या तो पुणे येथे वास्तव्यास आहे. त्याच्यावर पुणे येथील एका व्यापाऱ्याचा खंडणीसाठी खून केल्याचा आरोप असून पोलीस त्याचा शोध घेत होते.
परवेज हा दि.17 रोजी साताऱ्यातील संगम माहुली परिसरात आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून परवेज थांबलेल्या संगम माहुली येथील एका मंदिराच्या परिसरात संयुक्त ऑपरेशन राबवले. यावेळी परवेज याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार विक्रम पिसाळ यांनी त्याच्यावर झडप मारून त्याला पकडले.
त्यानंतर परवेजची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीन पिस्टल व चाळीस जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली. याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
परवेज याच्यावर पुण्याच्या व्यापाऱ्याचा खंडणीसाठी खून, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार,पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विक्रम पिसाळ, प्रवीण कडव, केतन शिंदे, महिला कर्मचारी मोनिका निकम यांच्यासह पुणे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.