चौथा उमेदवार महाविकास आघाडी मिळून ठरविणार
नवी दिल्ली – राज्यसभेच्या निवडणुकीतील चौथ्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत “तूतूमैमै’ सुरू असतानाच महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटली. यानंतर कॉंग्रेसराकॉं संबधात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेवून राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा केली. महाराष्ट्रात 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होते आहे. त्यात महाविकास आघाडीच्या 4 जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी 1, कॉंग्रेस 1, शिवसेना 1 असा प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे 17, कॉंग्रेसकडे 7 तर शिवसेनेकडे 19 मतं अतिरिक्त उरत आहेत.
महाविकास आघाडीत वादाचा मुद्या आहे तो चौथ्या जागेचा. राकॉने चौथ्या जागेवर आपला दावा ठोकला आहे. यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. अशात सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर थोरात यांनी राष्ट्रवादीला सूचक इशारा दिलेला आहे.
राज्यसभेच्या जागेवरुन कॉंग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. चौथी जागा महाविकास आघाडीत नेमके कोण लढवणार याबाबत काही ठरत नाही. कारण एकीकडे राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की चौथा उमेदवार एकत्रितपणे ठरेल. मात्र फौजिया खान यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून काही अधिकृत संदेश आलेला नाही.
महाविकास आघाडीत मंत्रिपदे मिळवताना जी रस्सीखेच पाहायला मिळाली तशीच आता राज्यसभेसाठीही पाहायला मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दोन खासदार निवृत्त होत आहेत, त्यामुळे परत राष्ट्रवादीचे दोन खासदार निवडून जावेत यासाठी राष्टवादीचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार, फौजिया खान यांची नावे निश्चित झाल्याचेही मानलं जाते आहे. पण आता कॉंग्रेस चौथी जागा सहजासहजी राष्ट्रवादीला द्यायला तयार नाही आणि जरी दिली तरी त्या बदल्यात विधानपरिषद किंवा पुढच्या राज्यसभा निवडणुकीत आपल्याला काय मिळणार याची गणिते कॉंग्रेसमध्ये सुरू आहेत.
महाराष्ट्रात कॉंग्रेसला तूर्तास एक जागा मिळणार हे निश्चित आहे. त्यासाठी इच्छुक अनेकजण आहेत. मात्र 8 जणांची नावे सोनिया गांधीकडे देण्यात आली आहेत. याआधी कॉंग्रेसने राजीव शुक्ला, पी चिदंबरम यासारख्या अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठवलेलं होतं. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवार असावा हा देखील राज्य कार्यकारिणीचा आग्रह आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसकडून कुणाचे नाव पुढे येते आणि महाविकास आघाडीतल्या चौथ्या जागेचा तिढा नेमका कसा सुटतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.