महापालिकेचा निर्णय : पार्किंग ऍपद्वारे करणार नियंत्रण
पिंपरी – कमी दरामुळे पार्किंग धोरणासाठी ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दरात वाढ करण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. प्रति तासासाठी वाहनाच्या प्रकारानुसार दर निश्चित केले आहेत. दुचाकीसाठी 5 रुपये, रिक्षा 5 रुपये, चारचाकी मोटरचालकांकडून 10 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
टेम्पो व चारचाकी मिनीट्रक – 15 रुपये, मिनी बससाठी 25 रुपये, खासगी बस, ट्रक आणि ट्रेलरसाठी प्रत्येक तासाला शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. या वाढीव दराला महासभेने मान्यता दिली. पार्किंग पॉलिसीच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पार्किंग ऍप तयार करुन पार्किंगचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने पार्किंग धोरण निश्चित केले होते. त्यास स्थायी समितीने 9 जून 2018 ला तर, सर्वसाधारण सभेने 22 जून 2018 मंजुरी दिली. या धोरणानुसार शहरात ज्या ठिकाणी दिवसभर 80 ते 100 टक्के पार्किंगची आवश्यकता आहे, असे ठिकाण झोन “अ’ (उच्च पार्किंग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के आहे, असे ठिकाण झोन “ब’ (मध्यम पार्किंग), ज्या ठिकाणी 40 ते 60 टक्के पार्किंगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन “क’ (कमी पार्कींग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन “ड’ (कमीत कमी पार्किंग) म्हणून घोषित करण्यात आले होते.
महापालिकेने शहरातील पार्किंग धोरणानुसार शुल्क आकारण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली होती. निविदेचा कालावधी तीन वेळा वाढविण्यात आला. तथापि, वाढविलेल्या कालावधीत देखील ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. कमी दर असल्यामुळे निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने महापालिका प्रशासनाने पार्किंगच्या दरात बदल केले.
शहराचे पाच विभाग करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हे वाहन पार्किंग शुल्क वसुलीचे काम 3 वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे महापालिकेस किती वाहने शहरात पार्किंगचा वापर करतात. त्यातून किती उत्पन्न मिळेल, याचा अंदाज येणार आहे. त्यानुसार पुढील निविदा प्रक्रिया राबविली जाईल. पार्किंग धोरण लागू झाल्यानंतर स्मार्ट पार्किंग योजना शहरातू लागू केली जाईल.
– श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता.