80 किलो दारुगोळ्यासह एके-47 बनावट नोटा जप्त
अमृतसर : जम्मू काश्मीरातून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानकडून काश्मीरसह भारतात अशांतता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांत पंजाबमधून तब्बल 80 किलो दारूगोळा, एके-47, बनावट नोटा आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाकिस्तानमधून मालवाहू ड्रोनच्या मदतीने हा शस्त्रसाठा पुरवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
जम्मू-काश्मीर प्रश्नांवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानकडून भारतात आत्मघाती हल्ले करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनीही सुरक्षा यंत्रणांना सर्तक केले आहे. गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराला चिथावणी देण्याचाही प्रयत्न होत आहे. या सगळ्या घडामोडी होत असतानाच पंजाबमध्ये पाक सीमेलगत असलेल्या तरणतारण आणि अमृतसर जिल्ह्यांमध्ये बनावट चलनासह प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
अमृतसर आणि तरनतारण जिल्ह्यात 9 ते 16 सप्टेंबर करण्यात आलेल्या कारवाईत 80 किलो दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या आयएसआयशी (आंतर-राज्य गुप्त यंत्रणा) संलग्नित असलेल्या खलिस्तान जिंदाबाद गटाने शस्त्रसाठा पुरवण्याचा कट पोलिसांनी 22 सप्टेंबर रोजी उधळून लावला. यात पाच एके-47 बंदूक, 16 दारूगोळे, नऊ हातबॉम्ब, पाच सॅटेलाईट फोन, दोन मोबाईल, दहा लाख किंमत असलेले बनावट चलनी नोटा यासह साहित्य जप्त केले आहे.
विशेष म्हणजे जड माल घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या ड्रोनच्या मदतीने हे साहित्य पाकिस्तानातून पाठवण्यात आले आहे. हे ड्रोनही पाकिस्तानी आहेत. खलिस्तान जिंदाबाद गटाकडून स्वतंत्र खलिस्तान प्रांताच्या मागणीसाठी पंजाबमध्ये आत्मघाती हल्ले करण्यासाठी हा शस्त्रसाठा आला होता, असा प्राथमिक चौकशीतून दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यातील काही साठा जम्मू काश्मीरमध्येही घातपात करण्यासाठी पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.