नवी दिल्ली : पेट्रोल पंपांवर पेट्रोल खरेदीसाठी असलेल्या क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये आता 0.75 टक्के सूट मिळणार नाही. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी अडीच वर्षांपूर्वी ही सवलत जाहीर केली होती. मात्र आता 1 ऑक्टोबरपासून ही सवलत रद्द करण्यात येणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी सुचवल्यानुसार इंधन व्यवहारावरील 0.75 टक्के कॅशबॅक 1 ऑक्टोबर , 2019 पासून बंद करण्यात येईल, असे “स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ या देशातील सर्वात मोठ्या बॅंकेने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.
नोटाबंदीनंतर 20016 च्या अखेरीस मोठ्या प्रमाणात रोख तुटवडयानंतर सरकारने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांना इंधन खरेदीसाठी कार्ड देयकावर 0.75 टक्के सवलत देण्यास सांगितले होते. क्रेडिट / डेबिट कार्ड आणि ई-वॉलेट्स वापरुन इंधन खरेदी केल्यास 0.75 टक्क्यांची सूट गेली अडीच वर्षाहून अधिक काळ चालू होती. आता ही सूट देणे थांबवण्याचे सरकारी तेल कंपन्यांनी ठरवले आहे. तथापि, डेबिट कार्ड आणि पेमेंटच्या अन्य डिजिटल पद्धतींवरील सूट कायम राहणार आहे.