पायल तडवी प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी
ओतूर-मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर पायल तडवी यांनी रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची आदिवासी विकास मंच जुन्नर तालुका यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी 5 जून रोजी जुन्नर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार असल्याचे विकास मंचाचे समन्वयक शंकर घोडे यांनी सांगितले.
वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार असून रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीवादक टीका करून पायलचं रॅगिंग केल्याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना कठोर शिक्षा व्हावी असे या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जुन्नरमधील शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जुन्नर तहसील कार्यालयावर निषेध पायी मोर्चा जुन्नर तालुका सकल आदिवासी समाज व जुन्नर तालुका आदिवासी विकास मंच यांचे वतीने काढण्यात येणार आहे. तसेच केवाडी येथील बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाना शासकीय मदत मिळावी, तालुक्यातील आमरण उपोषणकर्ते गंगाराम दत्तू भला यांना न्याय मिळावा आदी मागण्यांचे निवेदन जुन्नर तहसील कार्यालयाला व पोलीस ठाण्याला दिले असल्याचे मंचाचे सदस्य शिवाजी मडके यांनी सांगितले.