…वंचित नव्हे, ही किंचित आघाडी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा टोला

पुणे – “शिवसेना-भाजप यांच्यातील वाद मिटला, पण प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातील वाद काही अद्याप मिटत नाही. हा वाद काही मोठा नाही. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काही उमेदवार उभे केले आहेत, पण ते निवडून येणार नाहीत. त्यांना निवडून यायचे असेल, तर त्यांनी सुद्धा महायुतीत सामील व्हावे, असा सल्ला देत आठवले यांनी वंचित बहुजन आघाडी ही आता किंचित आघाडी झाली आहे, असा टोमणा केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांला लगावला आहे.

पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रामदास आठवले यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्‍नांवर आपली मते मांडली. याप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, मंदार जोशी उपस्थित होते. “महायुतीमध्ये रिपाइंसाठी एक जागेची मागणी करण्यात आली होती. आम्ही जी जागा मागत होतो, ती शिवसेनेची होती आणि ते ती जागा सोडायला तयार नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आता खासदार आणि मंत्रीपण आहात. तुमची ही पदे कायम ठेवू असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये योग्य स्थान देऊ, असे आश्‍वासन दिल्याने आम्ही माघार घेतली व महायुतीमध्ये सामील झालो आहोत. शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यासाठी जर एखादा मतदार सोडावा लागला असता, तर शिवसेना आणि भाजपाची युती तुटली असती. तसे होऊ नये, म्हणून मी अखेर माघार घेतली,’ असेही आठवले म्हणाले.

भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्री व्हावी, असे मला वाटते. त्यातून पाकिस्तानचीही प्रगती होईल, असेही आवठले म्हणाले.

बारामती मला फार आवडते…
बारामतीमध्ये आपण प्रचाराला जाणार असून बारामती मला फार आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी होणार आहे. या सभेच्यावेळी मी नक्की जाणार आहे. शरद पवार हे माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत. आतून आणि बाहेरुन दोन्हीकडून मी त्याच्यावर प्रेम करतो, पण निवडणुकीत नाही. त्याचबरोबर हे त्यांचे माझ्यावर प्रेम आहे, की नाही हे मात्र अद्याप समजलेले नाही, अशी कोपरखळीही रामदास आठवले यांनी लगावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.