निवडणुका जोरात, शहर “राम’भरोसे

सदस्य, पदाधिकारी प्रचारात, कर्मचारी निवडणुकीच्या कामात
अनेक सभा तहकूब

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच समित्यांच्या साप्ताहिक, पाक्षिक व मासिक सभा तहकूब करण्यावर भर दिला जात आहे. 20 मार्चची नियोजित मासिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. याशिवाय महापालिकेची तिजोरी असलेली स्थायी समितीची 27 मार्चची साप्ताहिक सभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागाची 22 मार्चला होणारी सभा तहकूब करण्यात आली आहे. शहर सुधारणा समितीच्या दोन सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकही तहकूब करण्यात आली आहे. आचारसंहितेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने, या सभांच्या विषयपत्रिकांमध्येदेखील किरकोळ स्वरुपाचे विषय येत आहेत.

पिंपरी – सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा वातावरण तयार झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही सर्वत्र केवळ राजकीय चर्चा आणि अंदाजांचाच पूर येत आहे. शहराचा समावेश असणाऱ्या मावळ आणि शिरुर लोकसभा मत दारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान चौथ्या टप्प्यात असले तरी प्रचाराला काही दिवसाचाच अवधी शिल्लक असल्याने सध्या महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवकही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची ड्युटी लागली असल्याने सध्या महापालिकेचा कारभार “राम’ भरोसेच सुरु आहे. महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारीही सापडत नसल्याने नागरिकांच्या समस्या सोडवणार तरी कोण? असा सवाल संतप्त नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी शेवटच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार असले तरी, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच हाय व्होल्टेज ठरत असलेल्या या दोन्ही मतदारसंघात प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. मतदानाची तारीख जशी-जशी जवळ येत आहे, तशी-तशी प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. त्यामुळे, साहाजिकच शहराचा गाडा हाकणाऱ्या महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकही प्रचारात उतरले आहेत.

पहिल्या टप्प्यात दिले तेराशे कर्मचारी

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिका प्रशासनाकडे मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळून महापालिका प्रशासनाला विविध टप्प्यांमध्ये एकूण आठ हजार कर्मचारी निवडणूकीच्या कामासाठी उपलब्ध करुन द्यायचे आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका प्रशासनाने 1326 कर्मचारी उपलब्ध करुन दिले आहेत. आणखी टप्प्याटप्प्याने एकूण आठ हजार कर्मचारी उपलब्ध करुन देणार आहेत.

सर्वच पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकारी प्रचारात उतरल्याने निवडणूक जाहीर झाल्यापासूनच महापालिकेत शुकशुकाट जाणवू लागला आहे. त्यात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीच्या ड्युटी लागल्या आहेत. त्यामुळे बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवडणुक विभागाकडे वर्ग झाले आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या धाम-धुमीत महापालिकेला मात्र कोण वालीच उरला नसल्याने मागच्या काही दिवसापासून महापालिकेचा कारभार “राम’ भरोसे सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने महापालिकेच्या बैठकीत निर्णय, ठराव प्रक्रियेवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे, सदस्यांनी महापालिकेकडेच पाठ फिरवली आहे. सदस्य आणि अधिकारी-कर्मचारीही गायब असल्याने सध्या महापालिकेचे कामकाज “राम’भरोसेच सुरु आहे. साधे काम करण्यासाठी गेलेल्या लोकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.