पुणे – बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ‘वऱ्हाड्यांवर’ कारवाईचा बडगा

मंगल कार्यालयांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचना

पुणे – मंगल कार्यालयांच्या बाहेर वाहने लावल्यास थेट कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मंगल कार्यालयांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शहरामध्ये मंगल कार्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संख्येबरोबरच कार्यालयांमुळे वाढणाऱ्या पार्किंगच्या समस्या देखील वाढत असल्याचे चित्र सर्व भागांमध्ये दिसत आहे. कार्यालयांचे अपूरे पार्किंग, पथारी व्यावसायिक, रस्त्यावर लावण्यात येणारी वाहने, रस्त्यांची धिम्या गतीने चालणारी कामे आदी गोष्टींचा ताण वाहतूक व्यवस्थेवर येतो. परिणामी, शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये भर पडते.

मे आणि जून महिन्यांमध्ये लग्न, मुंज आदी कार्यक्रमांच्या मुहूर्तांची संख्या जास्त असते. सर्वांना येण्यास सोयीस्कर ठरेल, या हेतूने शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये मंगल कार्यालय “बुक’ करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. प्रशस्त कार्यालयांच्या अंतर्गत सुविधांकडे लक्ष देताना नागरिक पार्किंगसारख्या महत्त्वाच्या सुविधेकडे मात्र डोळेझाक करतात. परिणामी वाहनांची पार्किंग व्यवस्था रस्त्यावर केली जाते. नागरिकांच्या अशा कारभारामुळे स्थानिकांना विनाकारण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

या पार्किंगच्या समस्येवर वाहतूक पोलिसांकडून आता तोडगा काढला जाणार आहे. रस्त्यावर बेशिस्त पद्धतीने पार्किंग करणाऱ्या “वऱ्हाड्यांवर’ आता वाहतूक विभागाकडून थेट कारवाई करण्यात आहे. मंगल कार्यालयांनी देखील आपल्याकडे कार्यक्रम नसताना, स्वत:चे पार्किंग अन्य कार्यालयांना उपलब्ध करून देत समन्वय साधावा, असे कार्यालयांना वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वारंवार वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे
1. नवले पूल ते कात्रज चौक
2. डीपी रोड
3. पौड रोड
4. सिंहगड रोड
5. शहरातील पेठा

अनेकदा कार्यालयांचे पार्किंग असून देखील नागरिकांची वाहने रस्त्यावर लावण्यात येतात. त्यामुळे अन्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मंगल कार्यालयांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी. त्याचबरोबर अन्य कार्यालयांबरोबर समन्वय साधून पार्किंगची सोय करण्याच्या सूचना वाहतूक विभागाच्या वतीने कार्यालयाच्या व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here