टाकळी ढोकेश्‍वरला 20 लाख 46 हजार पकडले

संयुक्त पथकाची कारवाई : रक्कम कोषागार कार्यालयात जमा
आयकर विभागामार्फंत या पैशाची होणार चौकशी

पारनेर – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्‍वर येथे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका वाहनातून 20 लाख 45 हजार 900 रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.31) दुपारी 12.55 वाजता निवडणूक पथकाने नगर-कल्याण रस्त्यावर कल्याणहून नगरच्या दिशेने जाणारे वाहन (क्र. एमएच- 05 ईएन- 8899) पकडले. यावेळी चालक मंगेश दशरथ गायकर (रा. कल्याण) यास वाहन थांबविण्याची सूचना केली. वाहनाची तपासणी केली असता, 20 लाख 45 हजार 900 रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

निवडणूक पथकात नंदेश कर्डिले, भास्कर झावरे, पो. कॉ. सूरज कदम, पो.कॉ. निवृत्ती साळवे, सरकारी वाहन चालक उज्वल निकाळजे आदींचा समावेश होता. सदर रक्कम नगर येथे कोषागार कार्यालयात जमा केली असून, संबंधित रकमेशी उमेदवारांचा संबंध नसून, मुंबई येथील बांधकाम व्यावसायीकाची ती असून, चार दिवसांत त्याची माहिती मागवण्यात आली आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर तालुक्‍यातील ही पहिलीच घटना आहे.

पैसे आमच्या पथकाने पकडले असून, त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर नगर आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. आयकर विभागा मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. यात संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास आचारसंहिता कक्षा मार्फत त्यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल.

विशाल तनपुरे, आचारसंहिता कक्ष प्रमुख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.