आमचा तिसरा विरोधी पक्षनेता पळवू नका! – अजित पवारांची मिश्‍किल टोलेबाजी

पहिला दिवस विरोधी पक्षनेत्यांशिवाय

मुंबई – पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडला. विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा केल्यानंतर गृहनिर्माणमंत्री म्हणून सत्ताधारी बाकावर बसलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाहून विधानसभेत राजकीय टोलेबाजी रंगली. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवू नका, अशी मिश्‍कील टिप्पणी केली.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी गटनेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता घोषित करण्याची मागणी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. यावर यथावकाश त्यांची निवड जाहीर केली जाईल, असे अध्यक्षांनी सांगताच अजित पवार यांनीही विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची मागणी करताना भाजपपे आता तिसरा विरोधी पक्षनेताही पळवून नेऊ नका, असा टोला लगावला.

माझी निष्ठा बदलणार नाही- वडेट्टीवार
आपल्याकडे लोकशाही असल्याचे सांगत एखाद्या व्यक्तीने येण्याची इच्छा व्यक्त केली तर तिला थांबवता येत नाही. उद्या वडेट्टीवार यांनीही इच्छा व्यक्त केली तर त्यांचे स्वागत असेल असे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनीही लगेच उभे राहत मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिले. मी एकवेळ फसलो. मी सध्या आहे तिथे खुश आहे. उद्या सत्ता आली की त्या बाजूला येईन. वारंवार निष्ठा बदलल्यास संबंधित व्यक्तीविषयी विश्वासार्हता राहत नाही. माझी निष्ठा बदलणार नाही, असे सांगत वडेट्टीवार यांनी विखे-पाटलांना टोला लगावला.

आधी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले, नंतर ते सत्तेत सहभागी झाले. यानंतर विखे-पाटलांनाही तुम्ही तिकडे ओढून घेतले. आता तिसरे झाल्यानंतर त्यांना मात्र तिकडे घेऊ नका. निदान निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना इकडे राहू द्या, अशी कोपरखळी अजित पवार यांनी लगावली. विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार नियुक्ती करावी यासंदर्भात आम्ही पत्र दिले असून त्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेतला जावा. विरोधी पक्षनेतेपद हा आमचा हक्क आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी वारंवार होत असताना अध्यक्षांनी मात्र ताकास तूर लागू दिले नाही. विरोधी पक्षनेत्याची मागणी करणे हा आमचा अधिकार आहे. सर्वांच्या सह्या घेऊन तसे पत्र दिले आहे, असे वारंवार बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र यथावकाश आपण नाव जाहीर करू असे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. यथावकाश या शब्दाला आक्षेप घेत थोरात यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड हा आमचा अधिकार असल्याचे सांगितले. यानंतरही अध्यक्षांनी शेवटपर्यंत विरोधी पक्षनेत्यांची घोषणा न केल्याने पहिल्या दिवसाचे कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवायच पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)