काळ्या पैसेवाल्यांना दिलासा नाही

प्राप्तीकराच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आज प्राप्तीकराविषयीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार मनी लॉंडरिंग, दहशतवाद्यांना अर्थसहाय्य, भ्रष्टाचार, बेनामी मालमत्ता बाळगणे आणि विदेशातील अघोषित मालमत्ता असणाऱ्या व्यक्‍तींना करचुकवेगिरीच्या गुन्ह्यातून सवलत मिळणार नाही, असे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी प्राप्तीकर कायदा 1961 अंतर्गत केली जाणार आहे.

करचुकवेगिरीबद्दल दंड भरून दिलासा देण्याचा विचार होणे हा करदात्याचा अधिकार नाही. करविभागाकडून प्रत्येक प्रकरणातील करदात्याचे वर्तन, स्वभाव आणि गुन्ह्याच्या परिणामांसारख्या गोष्टींची दखल घेऊनच अशा सवलतींबाबतचा विचार केला जाईल.

जर एखादी व्यक्‍ती कोणत्याही स्वरुपाच्या देशविघातक स्वरुपाच्या किंवा दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असल्याचे आढळून आले किंवा “पीएमएलए’ कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालय, सीबीआय, भारतीय दंड संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, लोकपाल लोकायुक्‍त किंवा स्थानिक पोलिसांसारख्या अन्य कोणत्याही कतपास यंत्रणांकडून जर चौकशी सुरू असेल तर त्या व्यक्‍तीला करचुकवेगिरीबाबतच्या तडजोडीद्वारा दिलासा मिळू शकणार नाही, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)