पतीकडूनच पत्नीचा खून

कराड – लग्नाला चौदा वर्षे होवूनही मूल होत नसल्याने तसेच चारित्र्याचा संशयावरुन पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना बनवडी, ता. कराड येथे मंगळवारी रात्री घडली. प्रतिभा उर्फ जयश्री जालिंदर वाघमारे (वय 34) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. घटनेनंतर पती जालिंदर उर्फ आबा प्रताप वाघमारे याने स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेळगाव, ता. कराड येथील प्रतिभा उर्फ जयश्री यांना सन 2005 मध्ये बनवडी येथील जालिंदर उर्फ आबा वाघमारे याच्याशी विवाह झाला होता. लग्नाला 14 वर्षे होऊनही या दाम्पत्यास अपत्य नव्हते. या कारणावरून जालिंदर उर्फ आबा याला नैराश्‍य आले होते. तसेच चारित्र्याच्या संशयावर जालिंदार हा पत्नी प्रतिभा हिला दारू पिऊन सतत मारहाण, शिवीगाळ करत होता. दोघांच्यात वारंवार भांडणे होत होती. मे 2018 मध्ये आजारी असताना प्रतिभा माहेरी हेळगाव येथे गेल्यानंतर तिने हा प्रकार मोठी बहिण राणी भंडारे हिला सांगितला होता. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर राणी यांनी तिची तसेच तिचा पती जालिंदर या दोघांची समजूत काढून प्रतिभाला सासरी बनवडी येथे पाठवले. मात्र काही दिवसानंतर दोघांतील भांडण पुन्हा सुरू झाले. मंगळवार, दि. 18 रोजी दुपारी चुलत्यांच्या घरात जालिंदर दारू पित बसला होता. यावेळी दिवसा दारू पिऊ नका, असे म्हणत प्रतिभा ही जालिंदरला उलट-सुलट बोलली. चिडलेल्या जालिंदरने तिला घरात जावून हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघांत पुन्हा भांडण झाले व जालिंदरने पत्नी प्रतिभा हिस हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतरही तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत जालिंदरने तिच्या पोटावर व गळ्यावर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यावेळी तिच्या कपाळावर एक जखम होवून त्यामधून रक्तस्त्राव होत होता. तिची हालचाल व श्‍वास थांबल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची जालिंदरची खात्री झाली. त्यानंतर तो तत्काळ शहर पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. आणि त्याने पोलिसांना केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केली. याबाबतची फिर्याद मृत प्रतिभा हिची मोठी बहिण राणी भंडारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here