उसाचे पीक झाले जनावरांचे खाद्य

लाखणगांव – ऊस पिकाला पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने ऊस पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांच्या येणाऱ्या गळीत हंगामात उसाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होणार आहे.

तालुक्‍यातील घोड नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. हमखास भाव मिळणारे पिक म्हणून शेतकरी उसाचे पीक घेतात; परंतु मागील दोन महिन्यांपासून घोडनदीला पाणी नसल्याने उसाचे पीक जळून गेले आहे. जळालेल्या पिकात शेतकऱ्यांनी जनावरे सोडली आहेत. त्यामुळे येणाऱ्या हंगामात उसाचा तुटवडा निर्माण होणार आहे. तसेच ऊस पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

लागवड केलेला ऊस तसेच खोडवा ऊस पाण्याअभावी करपला आहे. पाऊस पडला तरीही हा उस परत फुटणार नाही. त्यामुळे वाळलेल्या उसात शेतकऱ्यांनी जनावरे सोडली आहेत. सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर बनला असून, जळून चाललेला ऊस तसाच तोडून टाकण्यापेक्षा जनावरांना चारा म्हणून शेतकरी उपयोगात आणत आहेत. सध्यातरी पाण्याअभावी जळालेल्या उसात जनावरे सोडून शेतकरी या उसाचा चारा म्हणून उपयोग करताना पहावयास मिळत आहे.

एकरी चाळीस हजारांपर्यंत नुकसान
ऊस लागवडीपासून आतापर्यंत हा ऊस जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. ऊस बियाणे, सरी काढणे, खते, औषधे, सरी फोडणी यांचा खर्च काढता शेतकऱ्यांना एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला आहे; परंतु पाण्याअभावी ऊस जळून गेल्याने शेतकरी कंगाल झाला आहे. शेतकऱ्यांना एकरी 30 ते 40 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.