जागेची मर्यादा पाहूनच मानाच्या खांदेकऱ्यांना पास

देवसंस्थानचे प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील : सोमवारी अंतिम निर्णय

आळंदी – माउलींच्या पालखी सोहळ्यात गतवर्षी पोलीस ठाण्याच्या वतीने 151 पास देण्यात आले होते. यंदा ते 250 देण्यात यावेत, अशी मागणी मानाच्या खांदेकऱ्यांची आहे. मात्र, जागेची मर्यादा पाहूनच यासंदर्भात सोमवारी (दि. 24) आयोजित केलेल्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देवसंस्थानचे प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (दि. 18) आळंदी देवाची पोलीस ठाणे, देवस्थान व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मानाचे खांदेकरी यांच्याशी सुसंवाद साधून यात्राकाळात येणाऱ्या अडचणी आयत्या वेळेस उभे राहणारे प्रश्‍न व समस्या सोडवण्यासाठी चाकण विभागाचे सहायक आयुक्‍त चंद्रकांत अलसटवार यांच्या अध्यक्षतेखाली एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेली ढगे पाटील बोलत होते. याप्रसंगी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधरी, निरीक्षक प्रकाश जाधव, मच्छिंद्र शेंडे, डॉ. अभय टिळक, सरव्यवस्थापक माऊली वीर, यात्रा समिती सभापती सागर बोरुंदिया, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, आदित्यराजे धुंडरे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, रामचंद्र भोसले, मानाचे 150 कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी पालखी प्रस्थान सोहळा काळात येणाऱ्या अडचणी व आयत्या वेळेस उद्‌भवणारे प्रश्‍नाची माहिती देऊन आळंदी देवस्थान, पोलीस प्रशासन यांच्या सुसंवादातून हे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी सर्वानुमते केली. देवसंस्थानच्या जागेची मर्यादा लक्षात घेऊन यंदा 100 दिंड्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. अलंकापुरी नगरित सुमारे 25 मंडळे असून किमान प्रत्येक मंडळात दहा-दहा पास देण्यात यावेत, अशी मागणी तरुण कार्यकर्त्यांनी देवसंस्थानकडे केली. दरम्यान, गतवर्षीच्या चांगल्या कामगिरीबद्दल आदिशक्‍ती जय गणेश ग्रुप या दोन मंडळांना सन्मानित केले.

कार्यकर्ते देखील सिव्हिलमधील पोलीसच आहात. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा कोणा एकट्याचा नसून सर्व भारतीयांचा आहे, तरी सर्वांनी एक दिलाने एक मनाने अतिशय धार्मिक भावनेने हा दैदिप्यमान सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा.
– रवींद्र चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी


सहाय्यक उपायुक्त चंद्रकांत अललटवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की पोलिसांना तुम्ही बाजूला थांबा व बघत रहा आम्ही कसे कार्य करतो अशा कामाची तुमच्याकडून अपेक्षा आहे. सर्व माऊली भक्‍तांना शुभेच्छा देऊन हा सोहळा पंढरीकडे अतिशय धार्मिक भावनेतून “माऊली माऊली’च्या नामघोषात मार्गस्थ करावा.
– चंद्रकांत अलसटवार, सहायक आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड

Leave A Reply

Your email address will not be published.