कोयनेचा पाणीसाठा पन्नाशीकडे

पाटण  – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणी साठ्याने पन्नाशीकडे वाटचाल केली आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणारे कोयना धरण यावर्षीही शंभर टक्के भरेल, असा विश्‍वास धरण व्यवस्थापनाने व्यक्‍त केला आहे. बुधवारी धरणात 48.94 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक या राज्यांची सिंचनाची व विजेची गरज भागविणारे कोयना धरण पन्नास टक्के भरले आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने सुरुवातीला यावर्षी कोयना धरण भरेल का नाही अशी चिंता व्यवस्थापनाला होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार सुरुवात केल्याने धरणात पाण्याची आवक वाढत गेली.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने धुवॉंधार सुरुवात केली. यामुळे 8 जुलैला धरणात तब्बल प्रतिसेकंद 50565 क्‍युसेक पाण्याची आवक होत होती. त्यावेळी धरणातील पाणीसाठा 27.40 टीएमसी होता. यानंतरही पाण्याची आवक समतोल रहात आजअखेर धरणात 15895 क्‍युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 48.94 टीएमसी झाला आहे.

15 ऑगस्ट ही कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची डेडलाईन आहे. यावर्षी जुन महिन्यानंतर 1 ते 14 जुलै या 14 दिवसात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणात तब्बल 40 टीएमसी पाणीसाठा झाला. मात्र गेल्या तीन दिवसापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. मात्र पुन्हा पाऊस सक्रीय होवून धरण शंभर टक्के भरेल, असा विश्‍वास धरण व्यवस्थापनाने व्यक्‍त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)