रहाटणीतील सराफी दुकान लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक

वाकड पोलिसांचे यश; 23 लाखांचा ऐवज जप्त

चिंचवड – रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून दुकान मालकावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच दरोडेखोरांनी दुकानातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणी दोन आरोपींना दोन गावठी पिस्तुलसह अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील 23 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून वाकड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते.

सुभाष मोहनलाल बिश्‍नोई (वय 24, रा. मंगाली मोहबत, हरियाणा) आणि महिपाल दुधाराम जाट (वय 21, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत, पोलीस आयुक्त आर. के. पदमनाभन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दिव्यांक मेहता यांचे रहाटणी कोकणे चौकात पुणेकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. 6 मार्च 2019 रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांच्या दुकानात पाच दरोडेखोर शिरले. त्यापैकी एकाने दिव्यांक यांच्या मांडीत गोळी मारुन त्यांना जखमी करत दुकानातील 90 लाख 15 हजार किमतीचे सोने व डीव्हीआर चोरून नेला. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तसेच, मोठ्या शिताफीने आरोपी सुभाष आणि महिपाल या दोघांना अटक केली. त्यांचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत.

ही कारवाई गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे, फौजदार हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी शाम बाबा, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, मनोज बनसोडे, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, दिपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, भैरोबा यादव, दत्तात्रय इंगळे व इतरांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)