मोदी जातीच्या नावावर मते मागतात – आनंद शर्मा

पुणे – या देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. मात्र मोदीं हे पहिले पंतप्रधान असे आहेत, की ते जातीच्या आणि सैन्यांच्या नावाने मते मागत आहेत. विरोधकांनी त्यांच्या जातीचा कधी नामोउल्लेखही केला नाही, तरी मोदी विरोधकांनी माझी जात काढल्याचे सांगत मते मागत आहेत. इतका खोटे बोलणारा पंतप्रधान कधी पाहिला नाही. अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली.

महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गोपाळ तिवारी, डॉ. अभिजीत वैद्य आदी यावेळी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, मोदीं कायमच कॉंग्रेसने काय केले विचारतात. मात्र कॉंग्रेसने देशासाठी संघर्ष केलाय, दोन पंतप्रधानांचे बलिदान दिले आहे. देशाच्या विकासासाठी कॉंग्रेसच दिवसरात्र प्रयत्नशील आहे. त्यामुळे मोंदीने सांगावे की भाजपने देशासाठी किती संघर्ष केला, किती जणांचे बलीदान दिले. त्यामुळे मोंदीने आम्हाला देशभक्ती शिकवू नये.

ज्यांनी लोकांना खोटी आश्वासने देऊन धोका दिला. चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढविली. अशा व्यक्तींपासून देशांची मुक्तता केली पाहिजे. मोदीं सरकारला देशातील नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 23 मे ला मोदींना धक्का देणारा निकाल लागेल. कॉंग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत 150 दिवस लोकांना काम देऊ, शासकीय सेवेतील रिक्त पदे तातडीने भरू तसेच नवीन नोकऱ्याही मोठ्या संख्येने निर्माण करू आश्वासनही शर्मा यांनी यावेळी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.