“उजनी’च्या पाणीपातळीत कमालीची घटली

file photo

110 टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये

सोलापूर – उजनी धरणाची गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची पाणीपातळी घटली आहे. उजनीची एकूण पाणीपातळी 490.110 मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा मायनस 1628.84 दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस 173.97 दलघमी आहे. उजनी धरणाची टक्केवारी मायनस 11.47 टक्के असून, गेल्यावर्षी धरणात प्लस 55.85 टक्के पाणीसाठा होता.

एक टक्का पाणी रोज घटतेय !
उजनीतून भीमा नदीला 7,100 क्‍युसेक तर कालव्याला 2,950 क्‍युसेक, बोगदा 520 क्‍युसेक असे 10,520 क्‍युसेक पाणी सोडल्याने रोज एक टक्का पाणी कमी होत आहे. सोलापूर, पंढरपूर अशा मोठ्या शहरांना जल संकटाचा सामना करावा लागणार असून, येणाऱ्या काळात शेतीबरोबरच शहरांनासुद्धा पाण्याचे संकट बसणार आहे. उद्योगांवरसुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे.

गेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लक होता. परंतु चालू वर्षी सप्टेंबरमध्ये 110 टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेले. म्हणजेच पाण्याचा भरपूर अपव्यय झाला आहे. याचा परिणाम येणा-या एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत जाणवणार आहे. अशात उष्णता भरपूर असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे. जवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाऱ्या काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार आहे. त्यातच सोलापूर पाणीपुरवठा योजना, एनटीपीसी व बारामती एमआयडीसी या सगळ्या योजनांबरोबरच अनेक उपसा सिंचन योजनांना पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी उपसा बेसुमार सुरू आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेती उत्पादनावर होणार असून, वीज कपात अशा संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.

नदीला सात हजार शंभर क्‍युसेकने पाणी सोडले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला असून, पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी आता करू लागला आहे. पुणे जिल्ह्याला वेगळा न्याय व सोलापूर जिल्ह्याला वेगळा न्याय का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)