परभणीत शिवसेना नगरसेवकाची निघृण हत्या

परभणी – परभणीत येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर शिवसेना नगरसेवकाची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे संपूर्ण शहरता खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अमरदीप रोडे असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे रविवारी सकाळी 10 वाजता पाण्यासंदर्भात प्रभागातील काही महिलांचा फोन आल्याने जायकवाडी वसाहत परिसरात गेले होते. यावेळी रोडे यांचा सहकारी रवी गायकवाड आणि किरण डाके यांच्यासोबत याच भागातील पाण्याच्या खड्ड्यावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी किरण डाके आणि रवी गायकवाड यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्‍यात दगड मारला. यात अमरदीप रोडे यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन्ही आरोपींनी तात्काळ नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करुन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रोडे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेची माहिती वेगाने शहरात पसरली, त्यानंतर याठिकाणी मोठा जमाव जमला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.