महापालिका नोकरभरतीचा चेंडू वित्त विभागाच्या कोर्टात

विधानसभा निवडणुकीमुळे भरती लांबण्याची शक्‍यता 
भरतीला “ब्रेक’ : साडेतीन वर्षात एक हजार सेवानिवृत्त
निम्म्याहून कमी कर्मचाऱ्यांवर हाकावा लागतोय पालिकेचा गाडा
तुषार रंधवे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकरभरतीचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने वित्त विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविला आहे. या विभागाचा अभिप्राय आल्यानंतर नगरविकास विभागाकडून नोकरभरतीला ग्रीन सिग्नल मिळणार आहे. वित्त विभागाकडून अभिप्राय केव्हा प्राप्त होणार, याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिकेचा समावेश “क’ वर्गातून “ब’ वर्गात झाला असला, तरी राज्य सरकारकडून रिक्‍त जागांच्या भरतीसाठी परवानगी मिळत नाही. सध्या 14 हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असताना केवळ साडेसहा हजार कर्मचाऱ्यांवर महापालिकेचा गाडा हाकावा लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या अत्यावश्‍यक सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता सरळ सेवेकरिता रिक्‍त असलेली पदे भरण्यासाठी “विशेष बाब’ म्हणून परवानगी द्यावी, अशी विनंती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पिंपरी महापालिका स्वायत्त संस्था असून आर्थिकदृष्ट्‌या सक्षम आहे. 35 टक्के आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून महापालिकेस नोकर भरती करणे शक्‍य आहे, याकडेही आयुक्‍तांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे जेमतेम 9 हजार 763 मनुष्यबळ मंजूर आहे. प्रत्यक्षात, केवळ 7 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. अद्यापही 2 हजार 763 कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत.रिक्त पदांपैकी बहुतांशी पदे ही वर्ग तीन आणि चारची असून महापालिकेच्या अत्यावश्‍यक सेवेतील आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी प्रस्ताव पाठवित नोकर भरतीकामी मान्यता द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

महापालिकेकडे सात हजार कर्मचारी असून, नवीन आकृतिबंधानुसार आणखी अडीच हजार नवीन पदांची निर्मिती अपेक्षित आहे. ही निर्मिती झाल्यास पालिकेचे कामकाज काहीसे सुरळीत होईल. दरम्यान, सातव्या वेतन आयोगाचा बोजा, उत्पन्नाची मारामार लक्षात घेता नवीन पदांना सरकारने हिरवा कंदील दिला तरी प्रत्यक्षात भरती होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. त्यातच लोकसभेनंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे नोकर भरती आणखी लांबणीवर पडण्याचीच शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)