पुणे – यश शहा व तारा शहा या दोन्ही स्थानिक खेळाडूंनी प्रत्येकी दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि कुमारांच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकूट मिळविला.
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मॉडर्न क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या 19 वर्षाखालील गटात यश याने अंतिम फेरीत अग्रमानांकित खेळाडू रोहनकुमार या ठाण्याच्या खेळाडूवर 21-14, 21-17 असा विजय मिळविला. दुहेरीत त्याने हर्षल जाधवच्या साथीत अजिंक्यपद मिळविले.
या अव्वल मानांकित जोडीने शंतनु पवार (नाशिक) व वेदांत काळे (ठाणे) यांचा 23-21, 21-15 असा चिवट लढतीनंतर पराभव केला. तारा हिने मुलींच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित रिया हब्बू हिच्यावर सनसनाटी विजय मिळाविला. अटीतटीने झालेला हा सामना तिने 21-12, 20-22, 21-11 असा जिंकला.