नुवान प्रदीप आणि लसिथ मलिंगाची भेदक गोलंदाजी
कार्डिफ – नुवान प्रदीप आणि लसिथ मलिंगाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 34 धावांनी पराभव करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 36.5 षटकांत सर्वबाद 201 धावांची मजल मारली होती. मात्र, सामन्यादरम्यान झालेल्या पावसामुळे सामना 41 षटकांचा करताना डकवर्थ लुईस पद्धतीने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 41 षटकांत 187 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र अफगाणिस्तानला 32.4 षटकांत सर्वबाद 152 धावांचीच मजल मारता आली.
यावेळी 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, सलामीवीर मोहम्मद शेहझाद 7 धावा करून परतला. तर, रहमत शाह आणि हसमतुल्ला शहिदी अनुक्रमे 2 आणि 4 धावा करून बाद झाल्याने संघाचा डाव घसरला. यानंतर दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हझरतुल्ला झईझई 30 धावा करून परतल्यानंतर गुलाबदिन नईब (23) आणि नजिबुल्लाह झारदानने (43) थोडाफार प्रतिकार केला. मात्र, त्यांचा प्रतिकार अपुरा पडल्याने अफगाणिस्तानला 152 धावांचीच मजल मारता आली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या श्रीलंकेच्या सलामीवीरांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत संघाला 4.5 षटकांतच अर्धशतकी मजल मारून दिली. हे दोघेही फलंदाज संघाला शतकी मजल मारून देतील असे वाटत असताना मोहम्मद नबीने कर्णधार करुणारत्नेला 30 धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. यावेळी त्याने कुशल परेराच्या साथीत 92 धावांची सलामी दिली.
करुणारत्ने बाद झाल्यानंतर सलामीवीर कुशल परेराने मैदानात आलेल्या लाहिरू थिरीमन्नेसह अर्धशतकी भागीदारी साकारली. परंतु, मोहम्मद नबीने एकाच षटकात थिरिमने 25, मेंडीस 2 आणि एँजेलो मॅथ्यूज 0 यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे लंकेची 4 बाद 146 धावा अशी स्थिती झाली. ही पडझड सुरू असताना सलामीवर कुशल परेरा एका बाजूला ठाण मांडून मैदानात उभा होता.
मात्र 33 व्या षटकात रशिद खानने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तेव्हा परेराने 81 चेंडूंचा सामना करताना आपल्या खात्यात 78 धावा जमवल्या होत्या. पावसामुळे 33 षटकांच्या खेळानंतर सामना थांबवण्यात आला. यानंतर सामना सुरू झाल्यानंतर सुरंगा लकमलने श्रीलंकेला 201 धावांची मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 36.5 षटकांत सर्वबाद 201 (कुशल परेरा 78, दिमुथ करुणारत्ने 30, मोहम्मद नबी 4-30, रशिद खान 2-17, दौलत झारदान 2-34, हमिद हसन 1-53) वि. अफगाणिस्तान – 32.4 षटकांत सर्वबाद 152 (नजिबुल्लाह झारदान 43, झईझई 30, नुवान प्रदीप 4-31, लसिथ मलिंगा 3-39).