खरिपाची दोन टक्‍के क्षेत्रावर पेरणी

यंदा पाच लाख हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन : पाऊस लांबल्याने मुगाच्या पेरणीत घट

नगर – दुष्काळी परिस्थितीचा प्रदीर्घ सामना केल्यानंतर जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही ठिकाणी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीला अद्यापही म्हणावा असा वेग आलेला नाही. कृषी विभागाने यंदा 4 लाख 78 हजार 638 हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले आहे. परंतु आतापर्यंत केवळ दोन टक्‍के म्हणते 9 हजार 734 हेक्‍टर क्षेत्रावर झाली आहे. यंदा पाऊस लांबल्याने मुगाच्या पेरण्याचा मोसम निघून गेला आहे. परिणामी मुगाच्या पेरणीत चांगली घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. जून महिन्याच्या 22 तारखेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतियश कमी पावसाची नोंद झाली होती. 63 टक्‍के पाऊस पडल्याने ऑक्‍टोबर महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई तोंड देत आहे. जुनच्या महिन्या आठवड्यानंतर परिस्थती बदलेल असे वाटले होते. पण हा महिना देखील कोरडा गेला.

22 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने अद्यापही पेरण्या सुरू झाल्या नाही. आता शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले, संगमनेर तालुक्‍यासह नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत व जामखेड या तालुक्‍यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या तालुक्‍यांमध्ये पेरणीला प्रारंभ झाला आहे. मुगाचे क्षेत्र कमी होणार असून यंदा कापूस, उडीद, बाजरी, सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यात साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात 19 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात, दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर बाजरी, 1 हजार 900 हेक्‍टरवर नागली, 17 हजार 500 हेक्‍टरवर तूर, 35 हजार हेक्‍टर उडीद, सोयाबीन 85 हजार हेक्‍टर, भुईमूग 8 हजार हेक्‍टर, 55 हजार हेक्‍टर मका, नगदी उत्पन्न म्हणून पाहिले जाणाऱ्या कपाशीची 1 लाख 30 हजार हेक्‍टर असा एकूण साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरीपाचा पेरणी उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.

खरीप हंगाम पेरणीसाठी 70 हजार क्विंटल विविध पिकांच्या बियाणांची मागणी कृषी विभागाने नोंदवली. यापैकी बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद आदी विविध बियाणे प्राप्त झाले आहे. कपाशीच्या नोंदवण्यात आलेल्या 3 लाख 75 हजार पाकिटांच्या तुलनेत 3 लाख 75 हजार पाकिटे प्राप्त झाली आहेत. युरिया, डीएपी आदी रासायनिक खतांकरता कृषी विभागाने दोन लाख दोन हजार मेट्रिक टनाचे आवंटन नोंदवले असून, त्यापैकी 1 लाख 70 हजार मेट्रिक टन रासायनिक खते प्राप्त झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)