जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही – शरद पवार

 शरद पवारांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

मुंबई – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पार्थ पवारच्या रूपाने पवार कुटुंबाने पहिल्यांदाच पराभव पाहिला. या पार्श्वभूमीवर “जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही’ अशा आशयाची पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना न खचण्याचे आवाहन केले आहे.

सलग दुसर्या लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही सपाटून मार खाल्ला. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ पाच जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जाणारा बारामती मतदारसंघात यंदा भाजपचे कमळ फुलणार असा छातीठोकपणे दावा भाजपाचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पण सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला असला तरी मावळमध्ये पार्थ पवारच्या रूपाने मात्र पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी शरद पवार यांनी जिंकलो नसलो तरी हरलेलो नाही अशी पोस्ट टाकली आहे.

काळ कठिण आहे, पण हरायचं नाही!

शरद पवार केवळ कार्यकर्त्यांना भावनीक पोस्ट टाकून थांबले नाहीत तर त्यांनी सातारा जिल्हयातील कोरेगाव मधील चिलेवाडी, नागेवाडीतील दुष्काळाची केली पाहणी केली. आज संबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. काळ कठिण आहे, मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेवू आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी स्थिती येवू नये म्हणून प्रयत्न करू. संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं असा आत्मविश्वासही शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या मनात जागृत केला.

यावर्षी पाऊस उशिरा येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नंतर पाऊस चांगला पडेल असं म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडेल, परंतु त्यासाठी आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पावसाचा थेंब न थेंब वाचण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे. त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे काम सुरूच ठेवलं पाहिजे किंबहुना आपण हे वाढवलं पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)