चिंतन : द बर्निंग क्‍लास

-सत्यवान सुरळकर

गुजरात राज्यातील सुरत येथे शुक्रवारी 24 मे रोजी तक्षशिला कॉम्प्लेक्‍स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेत कोचिंग क्‍लासच्या 21 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी बळी गेला, ही घटना मनाला चटका लावून गेली. आगीचे चटके सहन करण्यापेक्षा चौथ्या मजल्यावरून खाली विद्यार्थी व विद्यार्थिनींनी टाकलेल्या उड्यांनी हृदयाचा ठेका चुकवला. ते दृश्‍य पाहून मन सुन्न झाले. क्षणभर डोळ्यासमोर हे काय होतेय यावर विश्‍वासच बसत नव्हता. साक्षात्‌ समोर अग्नी नाचत असताना त्या मुलांची काय अवस्था झाली असेल. अग्नीचा समोर खेळ सुरू असताना आगीचे चटके सहन करण्यापेक्षा उंचावरून खाली उडी मारणे त्यांना जास्त सोयीचे वाटले असावे.

हा अग्नितांडव सुरू असताना पुन्हा एकदा माणसाची दोन रूपे समोर आली आहेत. एक बघ्याची भूमिका घेणारा व दुसरा स्वतःचे प्राण संकटात घालून शक्‍य होईल तेवढ्यांचे प्राण वाचवणारा. अनेकजण आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होते. तर एका खऱ्या हिरोने तिसऱ्या मजल्यावर बाहेर थोड्याशा आधारावर उभे राहून उडी मारणाऱ्यांना हाताने झेलून दोघातिघांचे प्राण वाचविले. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची तोबा गर्दी. खालून गर्दी मुलांना उड्या टाकू नका असे सांगत होती तरीही मुलांनी आपण खाली उड्या मारल्याने जगू असे त्यांना वाटले असावे किंवा भयभीत झालेल्या मुलांना दिसेल तो मार्ग त्यांनी निवडला.

अग्निशमन दलाने अक्षम्य गुन्हा केलेला आहे. तब्बल 45 मिनिटे उशिरा पोहोचले. त्यांच्याकडे एकच शिडी होती आणि तीही कमी उंचीची. त्यांच्याकडे आग विझवण्यास पुरेसे पाणी नव्हते. नंतर 19 गाड्या पाठविण्यात आल्या. एक तासानंतर ही आग आटोक्‍यात आली. या घटनेवरून पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळा कारभार उघड्यावर पडला आहे. एखादी घटना घडल्यानंतरच आपल्या प्रशासनाला जाग येते. तोपर्यंत सुस्त अजगरासारखे ते एका जागी पडून असतात. देश एकीकडे लोकसभा विजयोत्सव साजरा करण्यात मग्न असताना प्रशासन मात्र झोपी गेलेले आहे. राजकीय पुढारी आपल्याच नांदात असतात. दुःखाचे दोन शब्द बोलले आणि निष्पाप जीवांची किंमत जाहीर केली गेली. या निरागस विद्यार्थ्यांचा जीव कवडीमोल पैशात मोजता येणार नाही.

आग लागली त्याठिकाणी अग्निरोधक असे काहीही साहित्य नव्हते. संकटकालीन बाहेर पडायचीही सोय नाही. यासाठी कोण जबाबदार आहे? फक्‍त एक-दोन ठेकेदार किंवा क्‍लासचालकावर गुन्हा नोंदवून काय फरक पडणार आहे? खरा गुन्हेगार कोणीही असला तरी या मुलांचा जीव परत येणार आहे का?

शिकवणीस गेलेली मुले आगीत अडकली आहे तर काहींनी इमारतीवरून खाली उड्या मारल्या आहेत हे ऐकून त्यांच्या पालकांची स्थिती शब्दांत सांगता येणार नाही. आभाळ कोसळावे एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यासमोर आली. सर्व विद्यार्थ्यांचे वय 15 ते 22 वर्षांपर्यंत होतं. या दुर्घटनेत 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. दुर्घटनेच्या वेळी आर्टस कोचिंग क्‍लासमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते. अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांची धावपळ सुरू झाली.

ही घटना अतिशय बोलकी आहे. आपत्ती ओढवल्यावर आपल्याकडे हमखास जीव गवमावे लागतात. आपत्ती येण्याअगोदर आपल्याकडे उपाययोजनांची सोय नसते. आपत्ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित त्यात जीवितहानी न होण्यासाठी प्रशासनाला जागे करायला हवे. महाराष्ट्रातदेखील आग लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यादृष्टीनेही उपाययोजना आवश्‍यक आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)