मेडिकल कॉलेजसाठी सातारा जिल्हा रुग्णालयाचे हस्तांतरण

सातारा – साताऱ्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी तीन वर्षांकरिता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हस्तांतर करण्याच्या निर्णयाला शासनाने मान्यता दिली आहे . यासंदर्भातील शासकीय अध्यादेश 15 जुलै 2019 रोजी जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याने त्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. तीनशे खाटांचे रुग्णालय आवश्‍यक सुविधांसह उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील सातारा जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास तीन वर्षांसाठी हस्तांतरित करण्याच्या आदेशाला राज्य शासनाने हिरवा कंदिल दिला. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रदीप बलकवडे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाच्या तब्बल 23 अटी घालण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालय व परिसराची जागा जरी हस्तांतरित झाली तरी इमारत व जागेचा ताबा जिल्हा शल्यचिकित्सकांकडेच राहणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यात तीन वर्षाचा करार असेल. वैद्यकीय रुग्णालयाची स्वतंत्र इमारत सुविधांसह त्यांच्या जागेत उभी राहावी. करार संपण्याच्या दिवशी जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागास चल अचल मालमत्ता व प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यासह परत करावे. सिव्हील सर्जन यांचे कार्यालय, प्रशासकीय कक्ष व औषध भांडार विभाग वगळता सर्व इमारत करारापर्यंत वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या नियंत्रणात असेल. सिव्हिल सर्जन यांचा कक्ष त्यांच्या पसंतीनुसार ठरवण्यात येईल.

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे प्रतिनियुक्तीने अधिष्ठाता यांच्या नियंत्रणात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. नवीन लेखाशीर्ष तयार करून निधी प्राप्त करणे, करारनाम्यानंतर इमारत सुरक्षा, स्वच्छता, वस्त्र धुलाई, आहार इ सेवा महाविद्यालय प्रशासनाने घावयाच्या आहेत. अवैद्यकीय सेवांचे नियंत्रण व देयके याची जवाबदारी अधिष्ठाता यांच्यावर राहणार आहे. रुग्णालयाचे एमबीबीएस अर्हता प्राप्त वैद्यकीय अधिकारी महाविद्यालयाकडे आवश्‍यकतेनुसार अपघात विभाग, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीने काम पाहतील.

जिल्हा रुग्णालयाचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंर्तगत येणाऱ्या एसएनसीयू, आरबीएसके, आयुष अशा सेवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे राहणार. त्यांचा कर्मचारी वर्ग शल्यचिकत्सकांच्या नियंत्रणात काम करेल. रुग्णालय इमारत उत्तम स्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित कराव्यात. करारनाम्याचे वाद आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक यांच्या अखत्यारित असणार आहेत.

मुंबईतील बैठकीमध्ये हस्तांतरण प्रक्रियेवर चर्चा

जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा आदेश पारित झाल्यानंतर औषधी द्रव्य विभाग व सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाची तातडीची बैठक मुंबईत पार पडली. वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात सार्वजनिक आरोग्य व द्रव्य औषधी विभागाचे अवर सचिव व जिल्हा शल्यचिकित्सक सातारा, नोडल ऑफिसर व वैद्यकीय अधिष्ठाता मेडिकल कॉलेज यांची मॅरेथॉन बैठक दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झाली.

बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, मेडिकल कॉलेजचे नोडल ऑफिसर डॉ. प्रकाश गुरव, डॉ. संजय गायकवाड, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, सुनील काटकर, रॉबर्ट मोझेस, डॉ. गायकवाड व डॉ. वाघमोडे उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा रुग्णालय वर्ग 1 ते 4 रुग्णांची सेवा हस्तांतरण, सार्वजनिक आरोग्य विभाग चल अचल मालमत्ता हस्तांतरण, जिल्हा शल्यचिकित्सक सातारा व वैद्यकीय अधिष्ठाता सातारा मेडिकल कॉलेज यांचे अधिकार व स्वायत्त क्षेत्रांचे वर्गीकरण, करारनाम्याच्या तरतुदी आणि प्रत्यक्ष हस्तांतरण या महत्वाच्या विषयांवर तपशीलवार चर्चा झाली. जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरण होणे हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाच वर्षाच्या पाठपुराव्याचे यश असल्याची प्रतिक्रिया सुनील काटकर यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)